निसर्गरम्य उसरणी गाव

उसरणी: लांब, स्वच्छ समुद्र किनारा व निसर्गाच्या कुशीत वसलेले एक सुंदर गाव.

सफाळे (प. रे.) रेल्वे स्टेशनच्या  पश्चिमेस १४ कि. मी. अंतरावर, झाडाझुडूपात (जणूकाही जंगलात) लपलेले, परंतु निसर्गाच्या कुशीत, सुंदर अरबी समुद्र किनारी वसलेले आमचे गाव. गावाच्या पश्चिमेस, दक्षिणोत्तर पसरलेला स्वच्छ, लांबसडक, सपाट, विस्तीर्ण २-३ कि. मी. लांबीचा अथांग अरबी समुद्र किनारा. त्यालगत काळ्या खडकांच्या रांगामध्ये दिसणारे संध्याकाळच्या सूर्यास्ताचे मनोहर दर्शन, क्षितिजावर आलेले लालबुंद सौदर्य आणि मनाला प्रसन्न करणारे थंड वातावरण आपल्या मनाला मोहून टाकल्याशिवाय राहत नाही. त्यात प्रत्येक पौर्णिमेला व अमावास्येला समुद्राला भरतीच्या वेळी येणाऱ्या लाटांचा आवाज मनाला आकर्षित व मंत्रमुग्द्ध करतो.

  गावाच्या नावाची उत्पत्ती कशी झाली हे जरी कोणाला सांगता येत नसलं तरी जुन्या जाणत्या, वयस्कर मंडळींच्या मते पुरातन काळी गाव म्हणजे जंगलच होते. पूर्वी येथे मुबलक प्रमाणात उसाची रानं च्या रानं उगवत असत व त्यावर लोकांची उपजीविका होत असे. त्यामुळे या गावाला उसाचे रान व कालांतराने उसर्णी (जुन नाव) नाव पडले असावे.

गावाची लोकसंख्या साधारण दोन हजाराच्या आसपास आहे. गावात वेगवेगळ्या जाती-जमातीची लोकं आहेत. मासेमारी करणारे वैती व मांगेला समाज, शेतीवाडी करणारे कुणबी, भंडारी, वाडवळ, ब्राह्मण, सोनार, मारवाडी, मुसलमान, हरिजन तसेच मोलमजुरी करणारे आदिवासी व बाभळीच्या दातवणावर उपजीविका करणारा वाघरी समाज. जशा अनेक जाती-जमाती आहेत तशाच वेगवेगळ्या वाड्या व आळ्या आहेत. वैती वाडी, मांगेला वाडी, भंडार वाडी, कुणबी वाडी, ब्राह्मण आळी, वाडवळ आळी, हरिजन वाडा, आदिवासी पाडा अशी गावाची जातीवर हुकूम रचना आहे. सतरापागड जाती असून देखील गावातील वातावरण शांत व खेळीमेळीचे आहे. सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांना मदत करण्यास उत्सुक असतात. गाव लहान व एका बाजूला असल्यामुळे आठवड्याचा बाजार होत नाही.

  पूर्वेस भादवे व मधुकरनगर, उत्तरेस दांडाखाडी आणि दक्षिणेस माथाणे अशी गावे आहेत. मधल्या परिसरात हिरवीगार गर्द झाडी आणि त्याच बरोबर मोकळी व हिरवीगार कुरणे आहेत. त्यांची नावे फार प्राचीन आणि मजेशीर आहेत. जसे किरीस्तावांचे (ख्रिश्चनांचे) भाट, भूताडातील शेती, मालावीतील शेती, पोंडयातील शेती, मोऱ्यावरची शेती, चौकीवरची शेती अशा अनेक नावांच्या शेती व वाड्या आहेत.

  गावातील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती, बागायती आणि मासेमारी. मासेमारी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. समुद्रात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी व सागरी तेल विहिरींमुळे तेलाचे/रसायनांचे तवंग तरंगत किनाऱ्या पर्यंत येतात. त्यामुळे समुद्रातील मासे मरतात किंवा लांब खोल समुद्रात जातात. त्यात भर म्हणजे, मोठ्या आधुनिक ट्रॉलर बोटींना पावसाळ्यात (मास्यांच्या प्रजनन काळात) मासेमारीची परवानगी दिली जाते किंवा ते अवैध्यरीत्या मासेमारी करतात. यामुळे लहानसहान मासे मारले जातात व वर्षानुवर्षे मास्यांचे प्रजनन आणि उत्पादन कमी होत आहे. अशा कारणांमुळेच लहान नौकांतून परंपरागत मासेमारी करणारे मच्छीमार देशोधडीला लागत आहेत.

  सुमारे ४० वर्षापूर्वी या गावात मासेमारी व्यवसाय जोमात होता. गावात सोन्याचा धूर निघत होता असे अतिशयोक्तीने म्हणावेसे वाटते. आज मासेमारी फारच कमी झाली आहे. त्याची कारणे अगोदरच दिली आहेत. त्या काळी २५ मासेमारी नौका होत्या, आज फक्त तीनच आहेत. अशा लहान मच्छीमारांसाठी  शासनाकडे विनंती करावीशी वाटते की, उसरणी गावाला नैसर्गिक सौदर्य सृष्टी, अथांग २-३ कि. मी. लांबीचा  अरबी समुद्र किनारा लाभलेला आहे. या ठिकाणी पर्यटनासारखा उत्पन्न देणारा व्यवसाय करण्यास परवानगी मिळाल्यास लोकांना बारमाही रोजगार मिळेल. ज्यामुळे लोकांची भरभराट होऊ शकते व सरकारला उत्पन्न देखील मिळू शकते.

  उसरणी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. आता गावाचे सरपंच आहेत मा. श्री. हरेंद्र रमाकांत पाटील उर्फ बंटी
आणि उप-सरपंच आहेत मा. सौ. रंजना किशोर तरे. ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने म्हणजे, घर-पट्टी / दिवा-बत्ती कर, दैनिक बाजार पट्टी, तलावाचे / धरणाचे लिलाव, दुकानी गाळ्यांचे भाडे तसेच लाकूड फाटा व इतर कर. आणि काही प्रमाणात शासकीय अनुदान व मदत.

  गावामध्ये एक प्राथमिक मराठी शाळा आहे, जीवन शिक्षण मंदिर उसरणी. शाळेत इयत्ता सातवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. शाळेची इमारत अगदी समुद्र किनाऱ्या लगत, मोकळ्या व हवेशीर जागी आहे. शाळा व समुद्र किनारा यामध्ये शाळेचे मोठे पटांगण आहे. गावात पूर्वी शेतकी सेवा सोसायटी होती. आज मासेमारी व्यवसाय अत्यल्प प्रमाणात होत असल्यामुळे सोसायटीचे अस्तित्व फक्त नावापुरतेच आहे. सोसायटीचे नाव आहे, उसरणी, मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी. गावामध्ये प्रत्येक प्रमुख जातींची उत्सव मंडळे व महिला मंडळे आहेत. त्यामुळे प्रत्येक मोठे सण सार्वजनिकरीत्या साजरे केले जातात. होळी, गौरी-गणपती, आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती अशा सणांमध्ये सर्व जाती-जामातीचे लोक एकत्र सामील होताना दिसतात.

  उसरणी गावाला प्राचीन परंपरा व इतिहास आहे. गावातील सर्व जुनी मंदिरे स्वयंभू आहेत. भवानी माता मंदिर (भवानी, वज्रेश्वरी, सरस्वती आणि हनुमान अशी दैवते एकाच मोठ्या मंदिरात विराजमान आहेत), वेताळाचे मंदिर, बाणेश्वाराचे मंदिर (२००८ साली नव्याने जीर्णोद्धार झालेले एक सुंदर मंदिर, या देवळात बाणेश्वराची पिंडी, गणपती, मारुती व शनी देव यांच्या मनमोहक मूर्ती आहेत), शंकराचे मंदिर, व्याघ्रेश्वराचे (वाघोबा) मंदिर आणि दोन वर्षापूर्वी समुद्र किनारी निघालेली उजव्या सोंडेच्या गणपतीची (सिद्धिविनायक) प्रतिमा, सर्वच स्वयंभू आहेत. त्याचबरोबर इतर देवदेवतांची पण बरीच मंदिरे गावात आहेत. सप्तशृंगी मातेचे मंदिर. गणपती मंदिर, कालिका मातेचे मंदिर, नित्यानंद बाबा मंदिर आणि प्रत्येक घराण्यांच्या कुलदैवातांची व शिवार मंदिरे पण आहेत.

श्री भवानी मातेच्या मंदिराची कथा मोठी विलक्षण आहे.

भवानी माता मंदिर (भवानी, वज्रेश्वरी, सरस्वती आणि हनुमान अशी दैवते एकाच मोठ्या मंदिरात विराजमान आहेत)सुमारे दीडशे वर्षापूर्वी या गावात नारायणदास नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांचा येथे एक आश्रम आणि फार मोठा शिष्यवर्ग होता. त्यांना एक विशिष्ट विद्या अवगत होती. ते माती आणि वनस्पती यांच्या मिश्रणातून सुवर्ण (सोने) तयार करीत असत. या विद्येत ते अत्यंत पारंगत होते आणि या विद्येतून मिळणाऱ्या लाभातून ते परिसरातील पंचक्रोशीतल्या अनेक गावांना गावाभोजन, भंडारा देत असत. अनेक वर्ष त्यांचा हा उपक्रम चालू होता. जेव्हा नारायणदासांच्या मनात लोभ निर्माण झाला. त्यांनी ह्या किमया विद्येचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची ती विद्या नष्ट झाली आणि ते निर्धन झाले. नंतर मात्र ते पश्चाताप करू लागले. त्यावेळी अचानक एका दिवशी वज्रेश्वरी, भवानी मातेने त्यांना स्वप्नांत येऊन दृष्टांत दिला. त्यांच्या आश्रमाजवळील कुंडातून महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती देवींच्या मूर्ती प्रकट झाल्या. नारायणदासांनी गावकऱ्यांच्या मदतीने ह्या तिन्ही मूर्तींची स्थापना करून भवानी मातेचे मंदिर उभारले. तिथे उत्सव सुरु केला. या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मोरेश्वरबुवा तथा मयुरानंद सरस्वतींच्या हस्ते झाली असून, त्यांनी येथे पौरोहित्य आणि कीर्तनाला सुरुवात केली. आजही हे भव्य मंदिर उभे असून, डॉ. किशोरकुमार व हेमकांत जोशी वंशपरंपरेने येथे कीर्तन परंपरा चालवत आहेत. आजही प्रत्येक वर्षी चैत्र अमावास्येला मध्य रात्री बरोबर बारा वाजता पालखी निघते आणि संपूर्ण गावाला फिरवली जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा वीज (लाईट, Electricity ) नव्हती, त्या वेळी लोक देवीची पालखी (अमावास्येला मध्यरात्री) पेट्रोमॅक्स (बत्ती) किंवा हिलाल (पेट्रोमॅक्स ला स्थानिक शब्द) घेऊन काढत, त्यामुळे याला हीलालाची पालखी असे सुद्धा म्हणतात. गावकरी खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करतात. पूर्वी चार दिवस चालणारा हा उत्सव सोहळा आता तीन दिवस चालतो. चैत्र कृष्ण चतुर्दशीला रात्री कीर्तन असते, चैत्र अमावास्येला पालखी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वैशाख शुद्ध प्रतिपदेला गावकऱ्यांतर्फे  सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. हि देवी नवसाला पावणारी आहे. जत्रेच्या दिवशी या देवीचे एक वेगळे रूप अनुभवण्यास मिळते. मंदिराच्या आवारात शिरण्यापूर्वी, पाण्याचे मोठे कुंड आहे. हे पाणी औषधी गुणधर्मी आहे व लोक ते तीर्थ म्हणून प्राषण करतात. पूर्वी जेव्हा लोकांना देवीचे रोगाची (कांजिण्या) लागण व्हायची त्यावेळी भवानी मातेला साकडं घातलेल्या कित्येक लोकांना या देवीने मरणातून वाचाविल्याच्या घटना ऐकण्यात आहेत. देवीच्या रोगाचे व्रण व इतर जखमांवर कुंडातील पाणी लावल्यास त्वरित आराम मिळतो. सर्व भाविक प्रथम या कुंडाचे दर्शन घेऊन मगच देवच्या मंदिरात जातात. जत्रेच्या दिवशी नवसाच्या भरपूर तळया आणि शिणगार (शृंगार) देवीला येतात. वर्षानोवर्षे काही भाविक वसई अर्नाळा या सारख्या गावांतून देवीच्या उत्सवाला नवस फेडण्यासाठी न चुकता येतात. भवानी मातेच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व गावकरी सुखी, समाधानी आणि सुरक्षित आहोत.

  आम्हा गावकऱ्यांना भाग्यवान वाटणाऱ्या अनेक कौतुकास्पद घटना ब्रिटीशांच्या / इंग्रजांच्या काळात घडलेल्या आहेत. २००-३०० वर्षापूर्वी, जेव्हा भारतात ब्रिटीशांचे राज्य होते, त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्याशी दिलेला लढा, त्यांची चित्तथरारक कामगिरी, नंतर ब्रिटीशांची गावातून हकालपट्टी अशा बऱ्याच घटना आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे.

  गावात एक खूप जुनी, प्राचीन "बलबाव" (बल म्हणजे बळ आणि बाव म्हणजे विहीर) नावाची रहस्यमय विहीर आहे. या विहिरीचे रहस्य असे की, बलबावीतले पाणी पिणाऱ्या व्यक्तीला खूप ताकद (बळ) यायची. यामुळे आमच्या गावातील लोकांमध्ये खूप शक्ती होती आणि ते  ब्रिटीशांबरोबर लढा देऊ शकले. परंतु, ब्रिटिशांनी जेव्हा हे रहस्य

कळाले तेव्हा गाव सोडून जाण्यापूर्वी त्यांनी या विहिरीमध्ये एक गाय मारून टाकली, जेणेकरून गावातील लोकांनी या विहिरीतील पाणी पिवू नये. आणि खरच त्या वेळेपासून लोकांनी या विहिरीचे पाणी पिण्यास बंद केलं. आजदेखील हि विहीर आमच्या लोकांनी एक आठवण म्हणून चांगल्या, सुस्थितीत शाबूत ठेवली आहे.

 गावाच्या मध्यभागी, मुख्य रस्त्यावर, ग्रामदैवत वेताळाचे मंदिर आहे. या मंदिराबाबत देखील एक विलक्षण घटना आहे. ब्रिटीशांची आणखी एक करामत. त्यांना हे मंदिर पाडून त्या जागी क्रूस (क्रॉस / Cross ) आणि चर्च बांधायचा होता. त्यासाठी त्यांनी अगोदर देवळाच्या सभोवती किल्ल्यासारखी संरक्षक भिंत बांधावयाचे ठरविले. जेव्हा गावातील लोकांना हे कळालं, तेव्हा त्यांनी किल्ला बांधण्यास विरोध केला. पण इंग्रजच ते, असेच कसे ऐकणार? त्यांनी किल्ला बांधण्यास सुरुवात केली. पण एका दिवसात त्यांचा जितका किल्ला बांधून व्हायचा, गावातील लोकं, रात्री तो पाडून टाकत. असे बरेच दिवस लोकांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले व शेवटी गावातून त्यांची हकालपट्टी केली. नंतर त्यांनी विरार वसई कडे पळ काढला व गाव किरीस्ताव (ख्रिश्चन) होण्यापासून वाचला. ग्राम देवता वेताळाचे महात्म्य व गावकऱ्यांच्या शक्ती पुढे इंग्रज हतबल झाले. आजही या चर्चचा / किल्ल्याचा पाया वेताळाच्या मंदिराच्या उत्तरेस विहिरी समोरील रोडवर उंचवट्याच्या स्वरुपात पहावयास मिळतो. मार्च २००१ मध्ये या घटनेचा प्रत्यय आम्हाला आला. मा. सौ. रेखा गंगाधर तरे या सरपंच असतांना, गावात प्रथम टेलिफोनची लाईन आली. देवळासमोर टेलिफोन केबल टाकण्यासाठी खोदकाम चालू असतांना सर्वांना आच्चर्य झाले. खाली लांबलचक, मोठमोठ्या दगडांनी मजबूत पाया बांधला होता. ते दगड एवढे मोठे होते की, ६-८ मजुरांना देखील हलविता आले नाही. शेवटी टेलिफोनची केबल वरतीच ठेवून ती बंद करण्यात आली. त्यावेळेला खरच अभिमान वाटला की, आम्हाला आमच्या पूर्वजांची कामगिरी अनुभवायला मिळाली. ते विशाल दगड, किल्ल्याचा पाया आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. यावरून त्या घटनेची सत्यता, विशालता आणि महत्व लक्षात येते.

  आणखी एक कौतुकास्पद उदाहरण म्हणजे, आमच्या शेजारी केळवा, माहीम इत्यादी गावे आहेत. पूर्वी वाहने नसल्यामुळे लोकं ६ ते १० की. मी. अंतर पायी, चालत जात असत. माहीम गावात तिरुपतीची जत्रा आणि पालखी असे. त्या वेळी ती पालखी उचलण्यासाठी फक्त उसराणीच्या लोकांनाच आमंत्रित केल जात असे. कारण असे की, एके वर्षी पालखी खूप वजन (जड) होती आणि कुणालाही उचलली जात नव्हती. सर्व लोकांना प्रश्न पडला. उसरणी गावातील काही लोकं तेथे जत्रेनिमित्त गेलेली होती. त्यांना हि गोष्ट कळली. त्यांनी विनंती केली की ते पालखी उचलण्याचा प्रयत्न करून बघतात. आणि त्यांनी ती जड पालखी सहज उचलली (कारण  बलबावीच्या  पाण्याची ताकद त्यांच्या अंगात होती). या घटनेनंतर पालखी उचलण्याचा मान उसरणी गावातील लोकांना मिळाला. त्या काळात पोलीस चौकी (स्टेशन) आणि कचेरी केळवे-माहीम गावातच होती. जेथे आपल्या खूप लोकांना ब्रिटिशांनी कैद करून ठेवले होते. आमच्या गावातील लोकांनी एक युक्ती केली. एके वर्षी जत्रा आणि पालखीच्या निमित्ताने जाऊन कचेरी लुटली. येथे लुटली याचा अर्थ कचेरीतून पैसा, संपत्ती लुटली किंवा चोरी केली असा नव्हे तर, त्या कचेरीत कैद करून ठेवलेल्या आपल्या सर्व लोकांची तेथून सुटका केली आणि त्यांना तिथून हाकलवून लावले. तेव्हापासून पोलीस स्टेशन आणि कचेरी पालघर येथे हलविण्यात आली. हि करामत उसरणी गावाच्या पूर्वजांनी केलेली आहे. 

  आणखीन एक ब्रिटीशकालीन विहीर गावात आहे. वैशिष्ठ म्हणजे हि विहीर खास घोड्यांना पाणी पाजण्यासाठी बांधलेली आहे. या विहिरीला पन्नास पायऱ्या आहेत ज्यामुळे घोडे स्वत:हून विहिरीच्या पाण्याच्या काठापर्यंत जाऊन पाणी पिऊन वर येत असत. अजूनही हि मोठया पायऱ्यांची विहीर अस्तित्वात आहे. ह्या परिसरातले हे एक आश्चर्यच आहे.

  गावात वाखाणण्यासारख्या बऱ्याच विशेष व्यक्ती आणि समाज कार्यकर्ते होऊन गेलेत. त्या पैकी एक व्यक्ती म्हणजे माजी सरपंच कै. श्री. विठू दगडू तरे. त्यांना पंचक्रोशीत विठू शेठ म्हणून ओळखत असत. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी, स्पृश्यास्पृश्य जमान्यात या व्यक्तीने आपल्या मालकीच्या विहिरीतून हरिजन लोकांना पाणी भरण्यास परवानगी दिली होती आणि गावातील लोकांचा रोष ओढवून घेतला होता. काही लोकांनी तर त्या विहिरीचे पाणीच पिणे सोडून दिले होते.  ६० वर्षांपूर्वी गावात शाळा नव्हती, त्यावेळी स्वत:च्या मालकीच्या घरात शाळा भरण्यास परवानगी दिली. आणि जशी शाळेची पट संख्या वाढत गेली, तशी जागा कमी पडू लागली. तेव्हा हरिजन वस्तीजवळ ७ खोल्यांची चाळवजा इमारत शाळेसाठी बांधून दिली. या व्यक्तीचे स्वत:चे शिक्षण फक्त दुसरी पर्यंत पण शिक्षणाचा हव्यास दांडगा होता. गावातील मुलं शिकायलाच हवी या उद्देश्याने शाळा बांधून दिल्या होत्या. आपल्या या परिसरात सातवी नंतरच्या शिक्षणासाठी महाविद्यालय (हायस्कूल) नव्हते, त्यावेळी आदर्श शिक्षण संस्थेने एडवण गावात हायस्कूल बांधण्याचे ठरविले. त्यासाठी पाध्ये सर, अंतुले सर, संस्थापक सुळे साहेब, कोकजे सर वैगरे मंडळी देणग्या गोळा करत फिरत होते. तेव्हा आपल्या भागात हायस्कूल होणार म्हणून विद्याभवन शाळेस ३००० रुपयांची देणगी दिली होती.

  कै. श्री. विठू दगडू तरे (विठू शेठ) यांनी किनारपट्टीवरील मुरबे गावापासून ते दातिवरे गावापर्यंतच्या मच्छीमार लोकांना बोटी / नौका बांधण्यासाठी व धंद्यासाठी खूप आर्थिक मदत केली होती. एवढेच नव्हे तर भूदान चळवळीचे प्रवक्ते व प्रचारक कै. श्री. शंकर देव यांच्या हस्ते आपल्या मालकीची आठ एकर जमीन गरीब लोकांसाठी भूदान केली. गावात येणारा मुख्य डांबरी रस्ता याच जमिनीतून जातो. या व्यतिरिक्त १९५० ते १९५५ सालच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये दुसऱ्या शहरातून धान्य मागवून गावातील लोकांमध्ये वाटले होते आणि उपासमारीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. गावास अस्पृश्यता निवारण्याचे बक्षीस मिळो अगर न मिळो पण अस्पृश्यता या गावातील लोकांनी केव्हाच वेशीला टांगली आहे. विठू शेठ सरपंच असतांनाच स्पृश्या-स्पृश्य प्रथा मोडून काढली आहे. समाज कार्यामध्ये कै. विठू शेठ यांचे खूप मोठे योगदान आहे. अशी दानशूर व्यक्ती मिळणे म्हणजे भाग्याची गोष्ट आहे.

  आमच्या गावातील अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री. पांडुरंग वामन तरे (गुरुजी). सध्याचे वास्तव्य वेसावे (वर्सोवा), अंधेरी. ह्यांना सन १९९३ साली केंद्र सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. हा शिक्षण क्षेत्रातला आपल्या भागातला पहिलाच असावा असे वाटते.

  गावातील जमिनीखाली पाण्याचा मुबलक साठा आहे. गावात कुठेही विहीर खोदली तरी पाणी मिळते ते सुद्धा गोड. समुद्र किनारा इतका जवळ असून गावात सर्व विहिरींचे पाणी गोड आहे. त्यामुळे उसरणी गावात पाण्याची समस्या नाही. गाव जरी झाडाझुडूपात असले तरी ह्या झाडाझुडूपात अनेक औषधी वनस्पतीची झाडे आहेत. आजही लोकं या औषधी वनस्पतीचा वापर करताना दिसतात. कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची झाडे असून त्याचा आस्वाद शाळकरी विद्यार्थी व मुलं लुटत असतात. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला हिरव्यागार शेतीच्या वाड्या आणि सुवासिक फुलांचा सुगंध दरवळत असतो.

  उसरणी गावातील पूर्वजांमध्ये खूप ताकद होती. तो काळ, त्यांच्या आठवणी, स्मृती ऐकण्याचे, अनुभवण्याचे भाग्य आम्हास मिळाले आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या पूर्वजांच्या भूमीवर, या मातीत वावरण्याचे सौभाग्य आम्हास लाभले आहे त्यामुळे आम्ही स्वत:ला धन्य समजतो.

गावाचे, पुर्वज्यांचे महात्म्य आपणापर्यंत पोहचविण्याची संधी आम्हाला मिळाली. धन्यवाद!

गावातील पुर्वाज्यांना, त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांना लाख लाख प्रणाम.

माहिती देणाऱ्याचे नाव:- मा. सौ. रेखा गंगाधर तरे,  माजी सरपंच.

Site is under construction.....

Thank you for visiting...

 

110487

Marine Fishers Identity Card Form

You can download here the "Application for Issuance of Biometric Identity Card to Indian Fishers".
For USARANI Fishermen, we have specially edited Application (Click to download) which is edited with common details applicable to only USARANI fishermen.
If others would like to have the similar edited version of this Application for their village please contact us with common details and will provide you the same.

समुद्रि मछिमार ओळख पत्र मिळविण्यासाठीचा अर्ज

इथे डाऊनलोड करा "Application for Issuance of Biometric Identity Card to Indian Fishers".
उसरणी गावतील मछिमारांसाठी  खास अर्जाचा नमुना इथुन (Click to download) डाऊनलोड करता येईन.
इतर गावातील मछिमारांना असा खास अर्जाचा नमुना हवा असल्यास तुमच्या सर्वसाधारण माहितीसहित आम्हाला संपर्क करा.

उसरणी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड वार्षिक अहवाल सन - २०१४-२०१५

उसरणी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड वार्षिक अहवाल सन - २०१४-२०१५